नांदेड जिल्हा न्यायालयात बॉम्ब असल्याची अफवा; परिसरात उडाली खळबळ
‘BDDS’ आणि ‘ATS’ कडून सर्च ऑपरेशन सुरू
प्रतिनिधी – पवन जगडमवार
नांदेड : नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आज दुपारी एका घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली. न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची आवई दुपारी २ वाजेच्या सुमारास वाऱ्यासारखी पसरली, ज्यामुळे न्यायालयीन कामकाजात मोठा व्यत्यय आला असून प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर तातडीने रिकामा करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण इमारतीची कसून शोधमोहीम राबवली जात आहे.
मुख्य प्रवेशद्वार बंद करून परिसर केला रिकामा
दुपारी नेहमीप्रमाणे न्यायालयाचे कामकाज सुरु असताना आणि वकील व पक्षकारांची मोठी वर्दळ असताना अचानक बॉम्ब असल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे परिसरात एकच भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलत संपूर्ण परिसर रिकामी केला. न्यायालयातील सर्व वकील, नागरिक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीने बाहेर काढून मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक वजिराबाद पोलिसांसह QRT फोर्स, दहशतवाद विरोधी पथक (ATS), एटीसी (ATC) आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) मोठा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. BDDS पथकाकडून मेटल डिटेक्टर, आधुनिक उपकरणे आणि श्वान पथकाच्या मदतीने न्यायालयाची इमारत, विविध दालने आणि आजूबाजूच्या परिसराची झाडाझडती घेतली जात आहे.
या अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे न्यायालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच बाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी संपूर्ण परिसराची कडेकोट नाकेबंदी केली असून शोधमोहीम अजूनही सुरू आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने नागरिकांनी आणि पक्षकारांनी घाबरून न जाता शांतता राखावी व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

