कमी कालावधीतही ‘ज्ञानतीर्थ-२०२६’युवक महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन: प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे
प्रतिनिधी – पवन जगडमवार
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटी संचालित येथील सायन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. पूर्वतयारीसाठी अत्यंत अल्प कालावधी मिळाला असतानाही महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापकांनी अहोरात्र मेहनत घेत या भव्य महोत्सवाचे यशस्वी नियोजन केले आहे, असे प्रतिपादन सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले.
महोत्सावाच्या यशस्वी आयोजनामागच्या प्रवासाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे म्हणाले, “सायन्स कॉलेजला या महोत्सवाच्या आयोजनासाठी फारसा वेळ मिळाला नव्हता. मात्र, अवघ्या १० ते १२ दिवसांच्या मुदतीत आमचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन मंडळ आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी एकजुटीने अहोरात्र परिश्रम घेतले.”बाहेरगावाहून येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थी, पालक, प्राध्यापक किंवा संघ व्यवस्थापकाची गैरसोय होऊ नये, यासाठी संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सीए प्रवीन पाटील हे विशेष लक्ष देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यापीठाने दिलेली पाहुणचाराची ही जबाबदारी महाविद्यालयाने एक सुवर्णसंधी मानून पार पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे सचिव प्रशांत सुतकर यांचीही उपस्थिती होती.
दुष्काळाचे वास्तव कलेच्या माध्यमातून मांडले
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. शिंदे यांनी एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावर प्रकाश टाकला. मराठवाड्यात सध्या निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचे वास्तव प्रतिबिंब या महोत्सवातील विविध कलासादरीकरणांमधून उमटत आहे. जलसा,एकांकी, प्रभावी पथनाट्ये आणि विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दुष्काळाच्या वेदना मांडत थेट शासनाचे लक्ष वेधण्याचा आणि समाजात जनजागृती करण्याचा स्तुत्य प्रयत्न केल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.
उत्तम नियोजनाबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्याकडून सायन्स महाविद्यालयाचे कौतुक
‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवात मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ११० हून अधिक महाविद्यालयांमधून १२५० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या महोत्सवाच्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी स्वतः पाचही मंचांना भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाची आणि राहण्याच्या व्यवस्थेची सूक्ष्म पाहणी केली. महोत्सवातील हे चोख नियोजन पाहून त्यांनी सायन्स कॉलेजचे प्राचार्य, संपूर्ण टीम आणि त्यांच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

