‘एक मन्नेरवारलू, लाख मन्नेरवारलू’ एकसंघ होऊन लढा देणार – सुरेशराव अंबुलगेकर
आदिवासी मन्नेरवारलू समाजावरील अन्यायाविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा
नांदेडमधील मार्गदर्शन शिबिराला समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद
पवन जगडमवार
नांदेड : आदिवासी मन्नेरवारलू समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्यात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अडवणूक केली जात आहे. जाचक अटी लादून आणि अन्यायी शासन निर्णय काढून समाजाला आदिवासींच्या यादीतून बाहेर फेकण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाचे सचिव सुरेशराव अंबुलगेकर यांनी केला. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी “एक मन्नेरवारलू, लाख मन्नेरवारलू” एकसंघ होऊन रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढतील, असा इशारा त्यांनी दिला.नांदेड येथे रविवारी ४ ऑक्टोबर रोजी आयोजित ‘राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या’ भव्य राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिरात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव ठक्करवाड हे होते. महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि उपस्थित मान्यवरांच्या सत्काराने शिबिराची सुरुवात झाली. या सोहळ्याला राज्यभरातून हजारो समाजबांधव, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सभागृह खच्चाखच भरले होते.आपल्या भाषणात अंबुलगेकर म्हणाले की, प्रमाणपत्रांसाठी कोणत्याही दलालांच्या नादी लागू नका. समाजातील गोरगरीब बांधवाना दलालांनी फसवल्यामुळेच आज समाजावर ही वेळ आली आहे. मन्नेरवारलू, मुनुरवार, मुनरवाड,मन्नेरवार हे सर्व एकच आहेत.परंतु वरिल जमातींनी कोणतीही मागणी न करता त्यांना एसबीसी मध्ये समावेश करण्याचा २४ एप्रिल १९८५ चा अन्यायी शासन निर्णय काढण्यात आला तो निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, ‘कंडिशनल प्रमाणपत्र’ आणि ‘रिओपनिंग’ च्या नावाखाली समाजबांधवांना दिला जाणारा त्रास त्वरित थांबवावा,तसेच बनावट प्रमाणपत्र काढणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना आमचा कायम विरोध आहे. परंतू खोट्या प्रमाणपत्रांच्या कायद्यातील कठोर अटी शिथिल कराव्यात, अशा प्रमुख मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या. शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आर्थिक व नैतिक पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात लक्ष्मणराव ठक्करवाड म्हणाले की, समाज बोलण्यापेक्षा कृतीची अपेक्षा करत आहे. हा लढा कोणत्याही जात, पक्ष किंवा अधिकाऱ्याच्या विरोधात नसून केवळ मन्नेरवारलू समाजाच्या न्याय-हक्कासाठी आहे. राजकीय किंवा वैयक्तिक फायद्यासाठी समाजाचा वापर केला जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी लवकरच नांदेड जिल्ह्यात मन्नेरवारलू समाजाचे भव्य राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याची घोषणा केली.या कार्यक्रमात संघटना मजबूत करण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्हा व तालुक्यांच्या नवनिर्वाचित अध्यक्षांना आणि सचिवांना नियुक्तीपत्रे देऊन जिल्हा व तालुका निहाय कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.या शिबिराला महासंघाचे उपाध्यक्ष मारोतराव कंठेवाड, कोषाध्यक्ष नामदेव मिठ्ठेवाड, सहसचिव व्यंकटराव सुरेवाड,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर,मनपा माजी शिक्षण सभापती सविता कंठेवाड,बालाजी कंठेवाड, पंडरीनाथ कंठेवाड, मोहनराव गोपुलवाड, दिलीप बास्टेवाड, नागनाथ अनंतवाड, गंगाधर गिरोड, मधुकर उन्हाळे, यलप्पा कोलेवाड,डाॅ.इरवंत पल्लेवाड,डाॅ. नागेश लखमवाड, संजय नागमवाड, सुनिल माचेवाड,सुधाकर कचकलवाड, महाजन उपलवाड, शंकर कंत्तेवार, सदाशिव पपुलवाड, डाॅ.डि.आर कवडेवार, यादवराव येवतीवाड, राधाजी कनसटवाड, रविंद्र अकोले, अँड प्रतिक पसलवाड,रामचंद्र मुसळे,शिवकुमार बैनवाड,बाळू पेंन्टेवाड,अमितकुमार कंठेवाड ,नयन पुदलवाड, देवराव टिप्परसे, विकास तोटावाड, विश्वबंर मिटके,नरहरी पल्लेवाड, संजय कोलगणे, चंद्रकांत कलेटवाड, संतोष बोनलेवाड, पवन आलुरकर, नगराध्यक्षा प्रेरणा कोटलवार, माधव यमलवाड, एन.टी. तिप्पलवाड ,साईनाथ अनंतवाड, सचिन कोटपेट,यांच्यासह समाजातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
