सायन्स कॉलेज, नांदेड आणि शिवा ग्लोबल अॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी; NEP 2020 अंतर्गत OJT उपक्रमास चालना
नांदेड : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव व व्यावसायिक कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने सायन्स कॉलेज, नांदेड आणि शिवा ग्लोबल अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्यात विद्यार्थ्यांच्या ‘ऑन-द-जॉब ट्रेनिंग’ (OJT) साठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील कार्यपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षण आणि उद्योगक्षेत्र यांतील दुवा अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हा करार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सामंजस्य कराराच्या प्रसंगी शिवा ग्लोबल अॅग्रो इंडस्ट्रीजचे संचालक मधुसूदन कलंत्री, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे, रसायनशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्र, अॅग्रोकेमिकल्स अँड फर्टिलायझर्स विभागाचे प्रमुख डॉ. डी. आर. मुंडे, चंद्रशेखर अय्यर आणि कार्तिक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगारक्षमतेला चालना मिळणार असून, उद्योग-अकादमिक सहकार्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

