खादीचा स्वीकार म्हणजे स्वदेशी, स्वाभिमान, आत्मनिर्भरता, स्वयं रोजगार, स्वावलंबन तथा देशाभिमानाचा जागर – डॉ. हंसराज वैद्य
गांधी जयंतीनिमित्त खादी विक्री केंद्र वजीराबाद येथे अभिवादन; दिवसभरात पावणे पाच लाखांची विक्रमी विक्री
नांदेड (प्रतिनिधी) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वतीने वजीराबाद येथील खादी विक्री केंद्रात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, चरख्याला वंदन आणि दीपप्रज्वलनाने महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे अध्यक्ष तथा विश्वस्त डॉ. हंसराज वैद्य, सचिव तथा विश्वस्त ईश्वररावजी भोसीकर, ज्येष्ठ साहित्यिक व खादीप्रेमी डॉ. जगदीश कदम, दत्तात्रेय पवार, हरीश व गिरीश ठक्कर बंधू, नगरसेवक यादव, समितीचे संचालक महाबळेश्वर मठपती, स्वामी, सावंत, वजीराबाद विक्री केंद्राचे व्यवस्थापक करेवाड, नांदेडे, गोपाल, राणे,सौ. माधुरी कार्लेकर, श्रीमती पद्मिनाबाई सावंत, कृष्णा कुलकर्णी यांच्यासह अनेक खादीप्रेमी नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. हंसराज वैद्य यांनी खादी ही केवळ वस्त्र नसून एक विचार धारा आणि जीवनदृष्टी असल्याचे सांगितले. खादीचा स्वीकार म्हणजे स्वदेशीचा स्वीकार, स्वाभिमान, आत्मनिर्भरता, स्वयंरोजगार, स्वावलंबन आणि देशाभिमानाचा जागर असल्याचे त्यांनी नमूद केले. खादीची चळवळ सृजनशीलता, संघर्षशीलता आणि समाधानी जीवन जगण्याची प्रेरणा देणारी असून तिच्या व्यापक वापरातून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या हाताला रोजगार मिळू शकतो. खादीची खरेदी म्हणजे गरजू कुटुंबांना अप्रत्यक्ष आधार देण्यासारखे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खादीचे वस्त्र उष्ण वातावरणात शीतलता, तर थंड वातावरणात उब देणारे असल्याने ते नैसर्गिकदृष्ट्या पर्यावरण पूरक तथा आरामदायी असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. खादी वापरातून मिळणारे मानसिक समाधानही वेगळे असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वदेशी व खादीच्या वापराबाबत केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महापौर सौ. कविता मुळे यांनी स्वतः खादीच्या साड्यांची खरेदी करून खादीच्या प्रचाराला पाठबळ दिले. गांधी जयंतीच्या दिवशी विक्री केंद्रावर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात सुमारे पावणे पाच लाख रुपयांची विक्रमी खादी विक्री झाल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.
ईश्वररावजी भोसीकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या खादी चळवळीचा इतिहास आणि मराठवाड्यातील तिच्या वाटचालीचा आढावा घेतला. बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, पद्मश्री शामराव कदम आणि बापूसाहेब काळदाते यांच्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
दरम्यान, खादी वस्त्रे, रेशमी व पॉली वस्त्रांवर २० टक्के, तर तयार वस्त्रांवर ३५ टक्के सवलत १४ नोव्हेंबरपर्यंत देण्यात येत आहे. नांदेडसह मराठवाड्यातील विविध खादी विक्री केंद्रांवर विविध प्रकारच्या खादी वस्त्रांचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर कविता मुळे, डॉ. हंसराज वैद्य, ईश्वररावजी भोसीकर, डी. के. देशमुख, ॲड. आर. के. बागल, वसंतरावजी नागदे, समितीचे संचालक मंडळ आणि प्रमुख व्यवस्थापक ज्ञानोबा सोळुंके यांनी केले आहे.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

