“निसर्ग एकवेळ पुरला, पण सरकार त्यापेक्षाही बेकार निघालं” – काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट सरकारवर हल्लाबोल
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी १ लाख रुपयांच्या मदतीची काँग्रेसची मागणी ; संभाजीनगरमध्ये ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर दि १४ आक्टोबर रोजी भव्य ‘जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’ धडकला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली आणि दुष्काळाची भीषण परिस्थिती अधोरेखित केली.
सपकाळ म्हणाले की, आज शेतकऱ्यांसमोर कसं जगायचं, कसं जगवायचं आणि कोणाकडे बघायचं, हा मोठा प्रश्न उभा आहे. पावसाअभावी मका, सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून, घरातील दागिने विकून आणि पदरचे पैसे खर्च करून पेरणी केली; मात्र हातात पीक येण्याऐवजी त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची जबाबदारी सरकारची असताना, अवघ्या ५ हजारांची तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने त्यांच्या दुःखाची थट्टा केली आहे.अशी टिका काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने सर्व बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्यावे,कसल्याही निकषांचा आणि याद्यांचा खेळ न करता सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेण्यात यावा, शेतमजुरांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी,एसटी प्रवासात सवलत दिली जावी,जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे,उद्योगपतींची कर्जे माफ केली जातात, मग शेतकऱ्यांनी काय बिघडवले? असा सवाल करत, दुष्काळाच्या काळात सावकार आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकरी कुटुंबांवर अधिकचा ताण येऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
“निसर्ग एक टाईम पुरला, मात्र सरकार तर त्यापेक्षाही बेकार निघालं,” असे म्हणत शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकारने करू नये, असे सपकाळ यांनी सुनावले. बैठका, घोषणा आणि अभ्यासाच्या नावाखाली वेळ न घालवता शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने भरीव मदत जमा करावी. हा राजकारण करण्याचा विषय नाही, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची वेळ आहे. सरकारने पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावेत आणि शेतकरी, शेतमजूर, त्यांची मुले व पशुधन यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे.
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस कटिबद्ध असून हेक्टरी १ लाख रुपये मदत, सरसकट कर्जमाफी आणि इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा संघर्ष असाच सुरू राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या मोर्चात एआयसीसी चे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार कल्याण काळे, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार शिवाजीराव काळगे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार राजेश राठोड, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश महासचिव डॉ. रेखा चव्हाण, सिद्धार्थ हत्तीअंभिरे, छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष अक्रम सय्यद, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, राजेंद्र राख यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

