महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या नांदेड तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड
संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार
नांदेड : महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत नांदेड तालुका कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली असून, या माध्यमातून संघटनेची दृढ एकजूट आणि सहकार्याची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
या निवडणुकीत जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून वसंत वैजनाथ जारीकोटे यांची निवड करण्यात आली आहे. तर नांदेड तालुका अध्यक्षपदी कैलास मोहनराव पेरके आणि तालुका कार्याध्यक्षपदी दत्ता आनंदा भुते यांची सर्वानुमते निवड झाली.त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्ष (नांदेड मंडळ) म्हणून वनिता बाबुराव सर्वज्ञ, तर तालुका उपाध्यक्ष (लिंबगाव मंडळ) म्हणून अनिता सुनील मोरे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या प्रशासकीय व संघटनात्मक जबाबदारीसाठी तालुका सचिव म्हणून विजयकुमार दिगंबरराव पाटील, तालुका खजिनदार म्हणून प्रल्हाद पंडरीनाथ येवते, तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून बालाजी जयसिंगराव होनवडजकर आणि तालुका संघटक म्हणून संभाजी संतराम वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच महिला प्रतिनिधी म्हणून अश्विनी रामकिशन वासलवार यांची निवड करण्यात आली आहे.
या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या विविध न्याय्य प्रश्नांना व अडचणींना प्रभावीपणे वाचा फोडून संघटनेला अधिक बळकटी देण्याचे काम केले जाईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.संपूर्ण तालुका कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

