करमाड पोलिसांची कारवाई १८ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक
कपाशीच्या शेतात केली गांजाची बेकायदेशीर लागवड
छत्रपती संभाजीनगर : करमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गाढेजळगाव शिवारात कपाशीच्या पिकात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीला करमाड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत १८ लाख १९ हजार ५०० रुपये किमतीचा ७२.७८ ग्रॅम (किग्रॅ) वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलीस ठाणे करमाडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सम्राटसिंग व्ही. राजपूत यांना गाढेजळगाव शिवारातील एका शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करून आवश्यक परवानगी घेण्यात आली. त्यानंतर पोलीस, महसूल विभाग आणि फॉरेन्सिक पथकाच्या संयुक्त विद्यमाने नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली.दि ९ ऑक्टोबर २०२६ रोजी गाढेजळगाव शिवारातील गट क्रमांक ३३३ मधील शेतात पंचांसमक्ष पाहणी करण्यात आली. तेथे कपाशीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना शेतातून एकूण ४३० लहान-मोठी गांजाची झाडे आढळली.
या कारवाईत पोलिसांनी १८ लाख १९ हजार ५०० रुपये किमतीचा एकूण ७२.७८ किग्रॅ वजनाचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी शेतमालक श्रीराम रघुनाथ कोरडे (वय ५० वर्षे, रा. गाडेजळगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,सदर इसमाला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूंजा एस. नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सम्राटसिंग व्ही. राजपूत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ एल. ठाकूर, पोलीस उप-निरीक्षक गणेश पी. वाघ, पोलीस अंमलदार जयसिंग नागलोत, शिवाजी मदेवाड, सोपान डकले, संतोष चव्हाण, श्रीकांत तळेगावकर, शकुल बनकर, महादेव धोत्रे, अमोल मारकवाड तसेच महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी कृष्णा कारभारी घुगे आणि फॉरेन्सिक पथकाचे कर्मचारी प्रतीक दरेकर यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

