आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी स्पर्धेत सेलूच्या क्रांती वीरला कांस्यपदक
जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी – पवन जगडमवार
नांदेड : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेलू या छोट्याशा गावातील आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातील लेकीने आपल्या अफाट मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील संजीवनी महाविद्यालय, चापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयात एम.एस्सी. प्रथम वर्षात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी क्रांती मुंजप्पा वीर हिने या स्पर्धेतील अतिशय अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या Foil Event मध्ये चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.
अत्यंत शांत स्वभाव, लहानपणापासूनच अभ्यासात आणि अभ्यासेतर उपक्रमांत अत्यंत हुशार असणारी क्रांती खेळाच्या मैदानातही तेवढीच आक्रमक आणि केंद्रित आहे. या संपूर्ण प्रवासात आणि यशामागे तिचे प्रशिक्षक निरंजन अकमार यांचे मोलाचे व अचूक मार्गदर्शन लाभले, ज्यांच्यामुळे क्रांतीला तिच्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देता आली.या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आणि पदकाच्या जोरावर क्रांतीने सलग दुसऱ्यांदा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फेन्सिंग चॅम्पियनशिप २०२६’ साठी आपली निवड अधिकृतपणे निश्चित केली आहे. ही मानाची राष्ट्रीय स्पर्धा जम्मू-काश्मीर येथे पार पडणार असून, क्रांती पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचा पराक्रम दाखवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
आपल्या या प्रेरणादायी प्रवासाविषयी बोलताना क्रांती म्हणाली, “मैदानावर घाम गाळत घेतलेली मेहनत आणि गळ्यातील हे पदक माझ्या स्वप्नांना नवे बळ देतात. पदक हा माझ्या कष्टाचा सन्मान आहे, तर ऑल इंडिया स्पर्धेतील ही निवड माझ्या ध्येयाकडे जाणारी आणखी एक महत्त्वाची पायरी ठरली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा विद्यापीठाचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असल्याने मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले.
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत क्रांतीने मिळवलेल्या या यशाने सेलू गावाचे आणि हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, नातेवाईक आणि संपूर्ण परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

