छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या त्रैमासिक सभेचे २५ ऑक्टोबरला आयोजन
जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष गुलाब पाटील वडजे
नांदेड : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची त्रैमासिक सभा संघटना अध्यक्ष नितीन धामणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी, रविवारी सकाळी १०:३० वाजता मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधनी, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या सभेला सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हाध्यक्ष गुलाब वडजे यांनी केले आहे.
या त्रैमासिक सभेत संघटनेच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून ते कायम करणे, राज्य संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर करण्यात आलेल्या पत्रव्यवहार व कामकाजाचा आढावा घेणे, तसेच ग्रामसभा बहिष्कार आंदोलनाबाबत चर्चा करून पुढील रचनात्मक धोरण ठरविणे या विषयांचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना ग्रामपंचायतींवर येणाऱ्या अतिरिक्त कामाच्या ताणतणावाबाबत चर्चा केली जाणार आहे.
संघटनेच्या अंतर्गत बाबींचा विचार करता, सर्व विभागांतील विभागीय पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन गरजेनुसार पुनर्रचना करणे, जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा सचिवांना पदोन्नती मिळाल्याने अथवा त्यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या किंवा तक्रारी असलेल्या जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यास मंजुरी देणे, आणि नवीन जिल्ह्यांमध्ये स्थापन झालेल्या जिल्हा कार्यकारिणींना मान्यता देणे यावर निर्णय घेतला जाईल.
तसेच संघटनेच्या जमा-खर्चास मंजुरी देणे, सभासद वर्गणी जमा करण्याबाबत चर्चा करणे, जिल्हास्तरावरील संवर्ग बांधवांच्या अडी-अडचणींचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना आखणे आणि अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान पदोन्नती प्राप्त, विशेष नावलौकिक मिळवलेले, नवनियुक्त पदाधिकारी व संघटनेत नव्याने समाविष्ट झालेल्या सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर सभासदांचे विचार, प्रश्न, मनोगत व चर्चासत्र पार पडेल आणि शेवटी अध्यक्षीय मनोगत, समारोप व आभार प्रदर्शन होईल. सभेच्या ठिकाणीच सर्व पदाधिकारी व सदस्यांसाठी अल्पोपहार व स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या सभेला नांदेड जिल्ह्यातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

