दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नगरसेविका सुप्रिया पाटील यांच्याकडून ३ महिन्यांचे मानधन ‘मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्याकडे धनादेश दिले
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. सुप्रिया संजय पाटील रातोळीकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी आपल्या तीन महिन्यांचे संपूर्ण मानधन ‘मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भातील धनादेश नुकताच खा.अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू, संकटग्रस्त आणि दुष्काळ निवारणाच्या कामासाठी उपयोगात यावा, या उदात्त भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील विनंती पत्र त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले असून, तीन महिन्यांचे संपूर्ण मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्विकारावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या या निर्णयाचे राजकीय व सामाजिक वर्तुळातून कौतुक होत आहे.
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी राजा चिंतेत असताना, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने आणि भक्कमपणे उभे आहे. “शेती हा आपल्या संस्कृतीचा कणा आहे आणि शेतकरी जगला तरच देश जगणार आहे,” या विचारातून शासन शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्यासाठी कटिबद्ध आहे. शासनाच्या या लोककल्याणकारी भूमिकेला बळ देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येणे गरजेचे असून, याच विचारातून नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी घेतलेला हा निर्णय इतर अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मराठवाडा प्रभारी आ. सुनीलजी राणे, मराठवाडा संयोजक नितीन काळे, एकनाथ पवार, निलेश देशमुख बारडकर, संजय पाटील रातोळीकर,ॲड. ज्ञानेश्वर मोरे आदीजण उपस्थित होते.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

