महाऊर्जा प्रश्नमंजुषा स्पर्धेत मनपा शाळा वजीराबादच्या विद्यार्थिनींचा डंका
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर पटकावले वर्चस्व!
नांदेड : महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) विभागीय कार्यालय लातूर तर्फे आयोजित ‘ऊर्जा संवर्धन व अपारंपरिक ऊर्जा विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६’ मध्ये पी.एम. श्री मनपा शाळा वजीराबादच्या विद्यार्थिनींनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तिन्ही अनुक्रमे मानाचे क्रमांक पटकावून शाळेच्या व शहराच्या लौकिकात भर घातली.
स्पर्धेत कु. वैष्णवी एकनाथ पाटमासे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला महाऊर्जा विभागातर्फे प्रशस्तीपत्र व तब्बल १५,००० रुपयांचा धनादेश श्रीमती हूमेरा अंजुम अब्दुल खालेद (प्रकल्प अधिकारी, महाऊर्जा विभागीय कार्यालय लातूर) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच द्वितीय क्रमांक कु. मानसी संगमेश्वर गीते हिने पटकावला असून तिला प्रशस्तीपत्र व १०,००० रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तर तृतीय क्रमांक कु. वैष्णवी त्रिशरण सोनकांबळे हिने पटकावला असून तिला प्रशस्तीपत्र व ५,००० रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.बक्षीस वितरण प्रसंगी विद्यार्थिनींसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. आपल्या पाल्यांच्या या यशामुळे विद्यार्थिनी आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमादरम्यान प्रकल्प अधिकारी श्रीमती हूमेरा अंजुम अब्दुल खालेद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत भविष्यातही शासनातर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये आवर्जून भाग घेण्याचे आवाहन केले.
या घवघवीत यशानंतर शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच महाऊर्जा विभागाचे शाळेतर्फे मनस्वी आभार व्यक्त केले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल नांदेड महानगरपालिकेच्या महिला व शिक्षण सभापती श्रीमती सदिच्छा सोनी पाटील व उपसभापती श्रीमती निरंजना लांडगे यांनी विद्यार्थिनींचे तसेच शाळेचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच महापालिका शिक्षणाधिकारी श्रीमती प्रविणा मांदळे यांनीही विद्यार्थिनींचे व शाळेचे विशेष अभिनंदन केले.सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

