नर्सेसच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा आदी बनसोडे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र नर्सेस असोसिएशनचे संस्थापक आदी बनसोडे यांनी दिले निवेदन
प्रतिनिधी – पवन जगडमवार
नांदेड : महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर नांदेड दौऱ्यावर आले असता, त्यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र नर्सेस असोसिएशनचे संस्थापक आदी बनसोडे यांनी आरोग्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यातील नर्सेसच्या विविध प्रलंबित मागण्यावर सविस्तर चर्चा केली.या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान अदि बनसोडे यांनी राज्यातील नर्सेसच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांकडे आरोग्यमंत्र्यांचे गांभीर्याने लक्ष वेधले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नर्सेस: एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेल्या नर्सेसचे नियमित सेवेत समायोजन करण्यात यावे, त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी आणि त्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांची तातडीने उकल करण्यात यावी,सार्वजनिक आरोग्य विभाग (DHS) नर्सेस: डीएचएस अंतर्गत कार्यरत नर्सेसच्या परीविक्षाधीन (Probationary) कालावधीबाबत शासनाने सकारात्मक आणि ठोस निर्णय घ्यावा यासह इतर विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करताना असोसिएशनचे संस्थापक आदी बनसोडे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील शासकीय, कंत्राटी तसेच खाजगी अशा सर्वच क्षेत्रांत अहोरात्र सेवा बजावणाऱ्या प्रत्येक नर्सला योग्य न्याय मिळालाच पाहिजे. त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि नर्सिंग क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांना शासनाने प्राधान्यक्रमाने सोडवणे अत्यंत गरजेचे आहे.”राज्यातील नर्सेसच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि न्यायासाठी महाराष्ट्र नर्सेस असोसिएशनचा हा लढा भविष्यातही असाच अविरत व तीव्रतेने सुरूच राहील,” असा पुनरुच्चारही या प्रसंगी आदी बनसोडे यांनी केला. आरोग्यमंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

