लातूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या कलाकारांची ‘अॅक्ट’ एकांकिकेने जिंकली प्रेक्षकांची मनं!
’अॅक्ट’ एकांकिकेतून समाजातील विकृत मानसिकतेवर जोरदार ताशेरे!
व्यसनाधीनतेचा काळा चेहरा आणि पोलिसांच्या खडतर तपासाची गाथा
विशेष प्रतिनिधी – पवन जगडमवार
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात कलाकारांनी केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, समाजातील अत्यंत ज्वलंत, विदारक आणि घाणेरड्या वास्तवाचा आरसाच प्रेक्षकांसमोर उभा केला. महोत्सवात पार पडलेल्या एकांकिका अभिनय स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालय, लातूरच्या कलाकारांनी सादर केलेल्या ‘अॅक्ट’ या एकांकिकेने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली असून, ही एकांकिका महोत्सवातील मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
’अॅक्ट’ या एकांकिकेतून दारूच्या आहारी गेलेला मनुष्य आपल्या कुटुंबाचे आणि नात्यांचे कसे विसर्जन करू शकतो, याचे अंगावर काटा आणणारे चित्रण करण्यात आले आहे. दारूच्या तीव्र व्यसनामुळे आणि पैशांच्या हव्यासापोटी स्वतःचा जन्मदाता बापच पोटच्या तरुण मुलीला वेश्याव्यवसायाच्या गर्तेत ढकलतो. या विकृत मानसिकतेमुळे एका निष्पाप मुलीवर जे अमानुष अत्याचार होतात, ते समाजाच्या लज्जास्पद वास्तवावर बोट ठेवतात. या नरकयातनेतून सुटका करून घेण्यासाठी ती मुलगी पळून जाण्याचा प्रयत्न करते, मात्र तिचा बाप तिला पुन्हा जबरदस्तीने पकडून आणतो. शेवटी, स्वतःच्या अस्मितेच्या आणि संरक्षणासाठी पेटून उठलेली ती मुलगी स्वतःच्याच जन्मदात्या बापाचा खून करते आणि रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना सापडते. या संपूर्ण घटनेमुळे त्या मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसतो, ज्यामुळे तिच्यासमोर जाणारा प्रत्येक पुरुष हा केवळ तिच्यावर अत्याचार करायलाच आला आहे, असा तिचा समज होतो आणि ती पूर्णपणे भयात जगू लागते.
या नाटकातून केवळ गुन्ह्याचे भीषण वास्तवच मांडले नाही, तर एखाद्या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांना किती कष्ट आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करावे लागते, याचे अगदी हुबेहूब दर्शन घडवले गेले आहे. प्रचंड भीतीपोटी आणि मानसिक धक्क्यामुळे पूर्णपणे गप्प बसलेल्या आरोपी मुलीला बोलते करणे ही पोलिसांसमोर एक अत्यंत नाजूक प्रक्रिया असते. या गुन्ह्याचा गुंता सोडवण्यासाठी पोलिस सुरुवातीला गजानन पेंडारकर या कलाकाराची (पात्र: रोहन गायकवाड) मदत घेतात. अभिनयाच्या आणि संवादाच्या माध्यमातून तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे तपासाला थोडीफार दिशा मिळते परंतु पूर्ण सत्य बाहेर येत नाही. जेव्हा इतर मार्ग अपुरे पडतात, तेव्हा तपासाचा खरा भाग म्हणून पोलिस इन्स्पेक्टर तनुजा शिंदे (पात्र: अंजली दीक्षित) स्वतः वेश्या बनून पोलिस ठाण्यात तिच्याशी संवाद साधतात. तरीही ती पूर्ण बोलायला तयार होत नाही, तेव्हा शेवटी इन्स्पेक्टर तनुजा शिंदे तिची आई बनून, एका आईच्या मायेने आणि भावनिक सादेने तिच्याशी संवाद साधतात. अत्यंत कौशल्याने वेषांतर करून आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करूनच पोलिस या गुन्ह्यामागचे मूळ कारण शोधून काढतात. एखादा कठीण गुन्हा उघडकीस आणताना पोलिसांना वैद्यकीय किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत, वेषांतर करणे, संशयिताचा विश्वास संपादन करणे आणि गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी अफाट भावनिक कौशल्यांचा वापर करावा लागते, हे या नाटकाने प्रभावीपणे दाखवून दिले.
या अत्यंत संवेदनशील नाटकात दयानंद कला महाविद्यालय, लातूरची विद्यार्थिनी समृद्धी खरे हिने मानसिक धक्का बसलेल्या पीडित मुलीची भूमिका अत्यंत जिवंत आणि प्रभावी ताकदीने साकारली. तसेच पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत तनुजा शिंदे (अंजली दीक्षित) आणि कलाकाराच्या भूमिकेत रोहन गायकवाड यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने पात्रांना न्याय दिला. या आशयघन एकांकिकेचे लेखन योगेश सोमट यांनी केले असून, दिग्दर्शन योगेश पोटभरे यांचे होते.
”आजची मुलगी अबला नाही, तर रणरागिणी!” — समृद्धी खरे
एकांकिकेतील संदेशाबद्दल बोलताना समृद्धी खरे म्हणाली, “ही केवळ एका व्यसनी बापाची कथा नाही, तर दारूच्या व्यसनापायी मानवी नातेसंबंध कसे रसातळाला जातात याचे विदारक चित्र आहे. आजची मुलगी कुठलाही अन्याय मूकपणे सहन करणारी अबला नाही, तर स्वतःच्या रक्षणासाठी, शोषणाविरुद्ध आणि या विकृत मानसिकतेला ठेचून काढणारी ‘रणरागिणी’ आहे. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी, व्यसनाधीनतेच्या विरोधात आणि विकृत मानसिकतेच्या मूळावर घाव घालण्यासाठी समाजाने एकत्र होऊन प्रखर आवाज उठवणे ही आजच्या काळाची गरज आहे.”
