महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अर्ज तात्काळ जिल्हास्तरावर पाठवावेत
सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांचे महाविद्यालयांना आवाहन
नांदेड (प्रतिनिधी ) : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठवण्यासाठी जुने महाडीबीटी पोर्टल ११ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या विहित मुदतीनंतर जुने पोर्टल कायमचे बंद होणार असून त्याऐवजी ‘MahaDBT 2.0’ हे नवीन आणि अद्ययावत पोर्टल पूर्णपणे कार्यान्वित केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शिष्यवृत्ती विभागाचे कर्मचारी यांना प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की महाविद्यालयांनी आपल्या लॉगिनमधील प्रलंबित असलेले केवळ पात्र शिष्यवृत्ती अर्ज अत्यंत गांभीर्याने तपासून ते तात्काळ जिल्हास्तरावर वर्ग करावेत असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.
१५ सप्टेंबर २०२६ ही जुन्या पोर्टलवरील अर्ज निकाली काढण्याची अंतिम संधी आहे. मुदत संपल्यानंतर जुन्या प्रणालीवरील कोणताही प्रलंबित अर्ज स्वीकारला जाणार नाही, तसेच त्याची केंद्रहिश्श्याची रक्कम शासनाकडून अदा केली जाणार नाही. यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होऊन पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्व महाविद्यालयांनी वेळेत कार्यवाही पूर्ण करणे बंधनकारक आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी या विहीत मुदतीत सर्व पात्र अर्ज मंजूर करून आपल्या स्तरावर ‘झिरो पेंडन्सी’ (शून्य प्रलंबितता) राखावी आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन समाज कल्याण नांदेडचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

