विद्यार्थ्यांना अपेक्षित शिक्षणव्यवस्था यावर पीपल्स महाविद्यालयात परिसंवाद
शिक्षणव्यवस्था अधिक विद्यार्थीकेंद्री करणार – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर
नांदेड : विद्यमान शिक्षणव्यवस्थेत अमुलाग्र बदल करून ती अधिक विद्यार्थीकेंद्री करण्याचा निर्धार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पीपल्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यार्थ्यांना अपेक्षित शिक्षणव्यवस्था’ या विषयावरील एक-दिवसीय परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए.डॉ. प्रवीण पाटील होते. उद्घाटनप्रसंगी परिसंवादात सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांनी शिक्षणव्यवस्थेत आपल्याला कोणते बदल हवेत याची सविस्तर मांडणी केली. या मांडणीचा धागा धरून डॉ. चासकर यांनी शिक्षणव्यवस्थेत कोणते बदल केले जात आहेत याचे विवेचन केले. अभ्यासक्रम हे अधिकाधिक उपयोजित केले जात आहेत याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. जी महाविद्यालये विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. विद्यार्थ्यांनी सनदशीर मार्गांनी आपल्या मागण्या मांडाव्यात असे आवाहन देखील यावेळी डॉ.चासकर यांनी केले. त्या मागण्या मान्य होतील यासाठी विद्यापीठाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. असे बदल झाल्यास मराठवाडा हा प्रगत आणि पुढारलेला प्रदेश बनेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रफुल अग्रवाल तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण, डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. सूर्यकांत जोगदंड आणि डॉ. सुरेखा भोसले उपस्थित होते. नरेंद्र चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना शिक्षणाचे स्वरूप अधिक व्यावहारिक झाले तरच येणाऱ्या काळातील मोठी आव्हानं पेलण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय समारोपात सीए.डॉ. प्रवीण पाटील यांनी शिक्षणव्यवस्थेतून देशाला गरज असलेले सजग विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षणव्यवस्थेतेने सक्षम माणसं तयार केली पाहिजेत असे त्यांनी यावेळी सांगितले. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विकास सुकाळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले तर परिसंवादाचे संयोजक आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. एन. मोरे यांनी परिसंवादाच्या मागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान जाधव यांनी केले तर पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे यांनी आभार मानले.
आदर्श महाविद्यालय, हिंगोली, येथील विद्यार्थिनी सपना केंद्रे यांच्या मांडणीने सर्व उपस्थित मान्यवर अतिशय प्रभावीत झाले. डॉ. चासकर यांनी केंद्रे यांचे विशेष कौतुक केले आणि त्यांनी जर पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेतला तर त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च कुलगुरूंच्या अखत्यारीतील विद्यापीठ निधीमधून केला जाईल असे टाळ्यांच्या गजरात जाहीर केले. सोबतच शिवाजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.अनुसया कुलथे यांनी विद्यार्थ्यांना अपेक्षित शिक्षणव्यवस्था या विषयावर भाष्य केले.
स्वतंत्र पत्रकारितेच्या चळवळीला हातभार लावा ! या QR code वर Scan करूनही सहभाग निधी देता येऊ शकेल.

